Indapur : शेतकऱ्याची पत्नी नव्हे, आता स्वतंत्र ‘महिला शेतकरी’ ओळख
Indapur : भाडेपट्ट्याने किंवा बटईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुचारक यांनाही या व्यापक व्याख्येत समाविष्ट करण्यात आले आहे.

इंदापूर : शेतीच्या प्रत्यक्ष कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना आता अधिकृत ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६च्या अंमलबजावणीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून पात्र महिलांना अर्ज करता येणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १७) इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे या ऑनलाइन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. महिलांना अधिकृत ओळख मिळाल्यामुळे शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि कृषी विस्तार सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.
महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीच्या मालकीचा निकष न ठेवता महिलेचा शेती व शेतीपूरक व्यवसायातील प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. पीक लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण यांसह विविध शेतीपूरक कामांचा त्यात समावेश आहे.
भाडेपट्ट्याने किंवा बटईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुचारक यांनाही या व्यापक व्याख्येत समाविष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत महिलांना प्रमाणपत्रासाठी पात्रता आहे.
ग्रामसभेची मान्यता; १५ दिवसांत प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्जानंतर तो पुढील नियमित अथवा विशेष ग्रामसभेसमोर ठेवण्यात येईल. अर्जदार महिला अधिनियमात नमूद केलेल्या किमान एका शेती किंवा शेतीसंबंधित कामात सहभागी असल्याची खात्री झाल्यानंतर ग्रामसभा ठराव करेल. मान्यता मिळाल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. नगरपंचायत क्षेत्रातील अर्ज पुढील सर्वसाधारण सभेत मांडले जातील.
महिनाभर विशेष जनजागृती
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कृषी विभागाच्या सेवा संकल्प अभियानातून महिला शेतकरी अधिनियमाबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. पात्र महिलांची ओळख पटविणे, ऑनलाइन अर्जासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





