Heavy vehicles: गणेशोत्सवात शहरात जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचे कडक निर्बंध जारी
Heavy vehicles: अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी

पिंपरी – लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवादरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत व सुरक्षित पार पडाव्यात, यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर जड व अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, गणेशोत्सवातील गर्दीचे व विसर्जनाचे मुख्य दिवस असलेल्या दिनांक १४, १९, २०, २४ आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना पूर्ण वेळ (२४ तास) प्रवेशबंदी असेल. याव्यतिरिक्त, उत्सवाच्या उर्वरित दिवसांमध्ये दररोज सायंकाळी ५:०० ते रात्री १२:०० या वेळेत ही बंदी लागू राहणार आहे.
शहरातील ‘या’ विभागांमधील मार्गांवर निर्बंध
वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम करण्यासाठी भोसरी, निगडी, पिंपरी, बावधन, वाकड, सांगवी, हिंजवडी आयटी पार्क, देहूरोड, चिखली आणि दिघी-आळंदी या प्रमुख वाहतूक विभागांमधील ६० महत्त्वाच्या रस्त्यांवर हे निर्बंध लागू राहतील. पिंपरी मुख्य बाजारपेठ, मोरया गोसावी परिसर, थेरगाव घाट परिसर, डांगे चौक-वाकड रस्ता, काळेवाडी-रहाटणी, आयटी पार्क हिंजवडी व आळंदीकडे जाणारे प्रमुख रस्ते जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.
नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
या प्रवेशबंदीतून अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलीस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी व जड वाहनचालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी माहिती फलक व बॅरिकेडिंग लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.





