Paetongtarn Shinawatra : थायलंडच्या पंतप्रधानांविरोधातला अविश्वास ठराव फेटाळला

बँकॉक –थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्या विरोधात संसदेमध्ये दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. दोन दिवस झालेल्या चर्चेनंतर या ठरावावर आज मतदान झाले.
त्यामध्ये पेटॉग्टॉर्न यांच्या बाजूने ३१९ मते पडली. तर विरोधात १६१ मते पडली. संसदेतील ७ सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे पंतप्रधानांविरोधातला अविश्वास ठराव सहज फेटाळला गेला.
पेटॉग्टॉर्न शिनावात्रा यांना देशाचे व्यवस्थापन व्यवस्थित करता येत नाही आणि त्या त्यांचे वडील, माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या प्रभावाखाली असल्याचा विरोधकांचा आरोप होता.
थाकसिनन हे एक लोकप्रिय पण अत्यंत वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना २००६ च्या लष्करी उठावात पदच्युत करण्यात आले होते. त्यानंतर ते देशाबाहेर निघून गेले आणि अलीकडेच थायलंडला परतले आहेत.
पेटॉग्टॉर्न या आपल्या नातेवाईकांचे विशेषतः वडिलांचे हित बघत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता. त्यांनी पंतप्रधानांवर करचुकवेगिरी आणि देशातील घसरत्या अर्थव्यवस्थेसह अनेक दीर्घकालीन समस्या चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला होता. यामध्ये वायू प्रदूषण, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांचा समावेश आहे.
पेटॉंग्टार्न या फू थाई पक्षाच्या प्रमुख आहेत हा पक्ष थाकसिन यांच्याशीशी संलग्न असलेल्या लोकप्रिय पक्षांच्या मालिकेतील नवीन पक्ष आहे. थाकसिन यांनी जवळपास दोन दशके थायलंडचे नेतृत्व केले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळात देशातील गरिब, वंचित आणि कष्टकरी समुदाय आणि श्रीमंतांमधील दरी वाढली होती.





