नवी दिल्ली – उद्या हरियाणातील भारतीय जनता पार्टी आणि जेजेपी सरकारच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. सरकारची कोंडी करण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.
भ्रष्टाचार, कुटुंब ओळख पत्र आणि भरती प्रक्रिया या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. हरियाणा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि विरोधी पक्ष नेते भूपेंद्रसिंह हुडा यांनी शोकप्रस्तावावर भाषण केले.
दरम्यान, कॉंग्रेसकडून मांडल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर पक्षाच्या सर्व आमदारांनी स्वाक्षरी केली आहे. तर या प्रस्तावाच्या विरोधात सत्ताधारी पक्षाकडूनही जय्यत तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेत भाजप आणि जेजेपी युतीला स्पष्ट बहुमत आहे.