नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सावरकर यांनी अंदमान येथील तुरूंगात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काढला. तुरूंगात राहणाऱ्यालाच हे समजू शकते की हे कसे असते. सावरकर असोत, नेहरू असोत किंवा सुभाषचंद्र बोस अथवा अन्य कोणीही भूतकाळात जाऊन इतिहासाची तोडजोड करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आमच्या पक्षाची हिंदुत्वाची विचारधारा आणि सावरकर यांच्याबाबतची भूमिका नेहमीच कॉंग्रेसपेक्षा वेगळी राहील. राहुल गांधी यांच्याशी आम्ही सहमत नाही. आघाडी ही समझोत्यावर चालते. कारण आघाडी करणे हाच एक समझौता असतो. आम्हाला कॉंग्रेससोबतची आघाडी कायम ठेवावी लागेल. आम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी थेट बोलू शकतो. सगळ्याच मुद्द्यांवर आमची सहमती होणार नाही. मात्र त्या दोन मुद्द्यांवर आम्ही तडजोड करणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले. आपली कोणाबद्दल काहीच तक्रार नाही. मात्र मी झुकलो असतो तर पक्ष मोडला असता. माझा जामीन रद्द करण्यासाठी ते उच्च न्यायालयात गेले. मात्र रद्द झाला नाही. मी न्यायाधीशांचे आभार मानले. ते म्हणाले मेरीटवर हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगतानाच मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच विजय होणार असल्याचा दावा त्यांनी केला. Gujarat Election 2022 : कॉंग्रेसने सरदार पटेलांचा कायम अवमानच केला – अमित शहा राज्यपालांवर टीका करताना ते म्हणाले की राजभवनाला भारतीय जनता पार्टीचे मुख्यालय बनवण्यात आले आहे. आपल्या लोकांची राज्यपाल पदावर वर्णी लावली जाते. कोणी संघाचा प्रचारक असेल तर त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र घटनात्मक पदावर बसल्यावर तुमचे कार्य वेगळे असते. लोकशाही, घटनेची हत्या केली जाऊ नये. राज्यपालांची कोणती राजकीय पक्षाची विचारधारा नसते. ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्माल फुले यांच्या विरोधात बोलतात. किती दिवस चालणार हे? आता तर त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत. फक्त भिंत पाहिली तुरूंगातील दिवसांबाबत बोलताना ते म्हणाले की, मी फक्त भिंत पाहिली. रात्री अंधारात काही दिसायचे नाही. झोप येत नसे. माझ्या डोळ्यांना समस्या झाली आहे. ऐकू येण्यासही त्रास होतो आहे. 15 दिवस मी सूर्यप्रकाश पाहु शकत नव्हतो. मात्र मनोधैर्य चांगले होते. मात्र राजकारणात हे सगळे होत असते. मी झुकलो असतो तर पक्ष फुटला असता असे त्यांनी सांगितले.