निवृत्ती राय या इंटेल कंपनीत भारताच्या कंट्री हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आई कपडे अत्यंत कुशलतेने शिवत असत. तिच्याकडूनच प्रेरणा घेऊन फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न त्यांना खुणावू लागले. परंतु लग्नानंतर पतीसोबत त्या अमेरिकेला गेल्या. त्यांचे पती तेथे इंटेल कंपनीत काम करीत असत. न्यूयॉर्कच्या रेन्ससेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून गणित व संचालन संशोधन विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच 1994 मध्ये त्यांनी डिझाइन इंजिनिअर म्हणून इंटेल कंपनीत प्रवेश केला. तेथे काही वर्षे काम केल्यानंतर 2005 मध्ये मोबाइल उपकरणांमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना बेंगळुरूला पाठवण्यात आले. तेथे काम करताना त्यांनी त्यांच्या क्षमता दाखवून दिल्या आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मार्च 2016 मध्ये त्यांना इंटेल भारतच्या कंट्री हेड म्हणून नियुक्ती दिली गेली. इंटेल ही कॉम्प्युटर चिप्सच्या निर्मितीच्या क्षेत्रात जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि जगातील अधिकांश कॉम्प्युटर्स इंटेलच्या चिप्सवरच चालतात.
इंटेलमध्ये वर्षानुवर्षे काम केल्यानंतर निवृत्ती राय यांनी स्वतः एक सेमिकंडक्टर चिप तयार केली आहे. ती खूपच कमी ऊर्जेवर काम करते. तसेच ग्रामीण संपर्कासाठीही त्यांनी एक पर्याय तयार केला असून, तो किफायतशीर तर आहेच; शिवाय उच्च गती असलेल्या ब्रॉडबॅंड कनेक्शन (उच्च गती डाटा संचरण तंत्रज्ञान) उपलब्ध करून देतो.
ही बाब शक्य करून दाखविण्यासाठी एका पथदर्शी प्रकल्पावर सध्या त्या काम करीत आहेत. “वायरलेस ओव्हर वायर’ असे नाव या प्रकल्पास देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये विजेच्या तारांच्या माध्यमातूनच इंटरनेट पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा डाटा स्वस्त असेल. जेथे वीज पोहोचली आहे, तेथे विजेच्या तारांच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचविले जाऊ शकेल. आगामी काळात ग्रामीण विकासात ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
निवृत्ती राय यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कंपनीकडून त्यांना विशेष सन्मान दिला गेला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना “नारी शक्ती पुरस्कार-2021′ प्रदान करण्यात आला.