Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बनणार जेडीयूचे अध्यक्ष; पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता
नितीश यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्याविषयीची औपचारिक घोषणा पुढील काही दिवसांत होईल.

Nitish Kumar – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष बनण्यास सज्ज झाले आहेत. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याने त्यांचे राष्ट्रीय राजकारणात कमबॅक होणार आहे. आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयीची उत्सुकता वाढली आहे.
बिहारमध्ये जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएचे सरकार आहे. त्या सरकारचे नेतृत्व नितीश सोडणार असल्याचे ते राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने स्पष्ट झाले. त्यांच्या जागी भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर नितीश कुठल्या भूमिकेत दिसणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, ते जेडीयूच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
नितीश यांच्या वतीने जेडीयूच्या नेत्यांनी पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयात अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात कुणी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाही.
त्यामुळे नितीश यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्याविषयीची औपचारिक घोषणा पुढील काही दिवसांत होईल. जेडीयूचे पुन्हा अध्यक्ष बनण्यासह इतर भूमिकेत नितीश दिसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी काळात बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग येईल.






