इराणच्या अध्यक्षांच्या शपथविधीला नितीन गडकरींची उपस्थिती

तेहरान – इराणचे सुधारणावादी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधीच्या समारंभाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मंगळवारी तेहरानमध्ये उपस्थित होते.
तीन आठवड्यांपूर्वी कट्टरपंथीय सईद जलिली यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर पेझेश्कियान यांची इराणचे नववे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
मंगळवारी त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मे महिन्यात कट्टरवादी अध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती.
गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अध्यक्ष पेझेश्कियान यांना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
गडकरी आणि इराणमधील नेत्यांच्या संवादादरम्यान दोन्ही बाजूंनी चाबहार बंदराच्या विकासासाठी सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचे सकारात्मक मूल्यांकन केले.
दोन्ही देशांच्या समृद्धी आणि विकासासाठी भारत-इराण संबंधांना विविध क्षेत्रांमध्ये पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आम्ही सतत सहकार्य आणि परस्पर वाढीसाठी उत्सुक आहोत,असे गडकरी यांनी सोशल मीडियावरच्या संदेशात म्हटले आहे.





