थेट नितीन गडकरीच घेणार झाडाझडती

यापूर्वीच दिला होता इशारा
2017मध्ये भूमीपूजन : चांदणीचौक उड्डाणपूल अजूनही रखडलेला
पुणे – भूसंपादनाअभावी दीडवर्षे रखडलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पाहणी करणार असल्याचे समजते. एका कार्यक्रमानिमित्त गडकरी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहेत. त्यातून वेळ काढून ते या कामाची पाहणी करणार आहेत. येथील सेवा रस्त्याचे काम 6 ठिकाणी सुरू आहे. याचीही पाहणी गडकरी करतील. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता आणि सेवा रस्त्यासाठी भूसंपादन महापालिका करणार आहे. यासाठी 31 हेक्टर जागेची आवश्यकता असून, 12 मीटर सेवा रस्त्यासाठी जागा देण्यास काही जागामालकांनी नकार दिला होता. तर काहींनी “बीडीपी’च्या दराने मोबदला न देता, रहिवासी दराने द्यावा, अशी मागणी केली होती.
प्रत्येक पुणे दौऱ्यात गडकरींनी या कामासंबंधीचा आढावा घेतला आहे. तसेच हे काम लवकर करण्याविषयी सूचनाही दिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर भूसंपादन लवकर न केल्यास केंद्र त्यातून अंग काढून घेईल, असा इशाराही दिला होता. “तुमच्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आणि टीका माझ्यावर होते, भूसंपादनासाठी पैसे हवे असतील तर तसा प्रस्ताव पाठवा,’ असेही आदेश गडकरी यांनी दिले होते. यानंतर दोन महिन्यांपूर्वी हे काम सुरू झाले आहे. सध्या येथे वेदभवन, झेनथ सोसायटी, भुसारी कॉलनी येथील सेवा रस्ते तयार करण्यात येत आहेत.





