Nitin Gadkari : पालखी मार्गावरील निकृष्ट कामांची आता खैर नाही; नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी
Nitin Gadkari : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नागपुरात नितीन गडकरींशी भेट; पालखी मार्गावरील त्रुटींचा पाढा वाचला.

Nitin Gadkari – संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग ९६५ जी) अपूर्ण आणि निकृष्ट कामांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांच्या विनंतीवरून गडकरी यांनी आगामी १० एप्रिल रोजी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी निश्चित केली आहे.
नागपूर येथे झालेल्या भेटीत पाटील यांनी पालखी मार्गावरील विविध अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत सविस्तर मांडणी केली. पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी गडकरी यांच्याकडे केली असता, त्यांनी तात्काळ होकार देत १० एप्रिल रोजी पाहणीचा निर्णय घेतला.
देहू ते पंढरपूर या महत्त्वाच्या मार्गावरील जंक्शन उड्डाणपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास, वडापुरी उड्डाणपूल, वकीलवस्ती भुयारी मार्ग, बावडा बाह्यवळण रस्ता तसेच इंदापूर ते माळीनगर या मार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.यासोबतच इस्टिमेटप्रमाणे वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक आदी कामे अनेक ठिकाणी झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काही भागांत गटारीची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. कामे पूर्ण न होता देखील सुरू असलेल्या टोल वसुलीबाबत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर गडकरी यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच अपूर्ण कामांदरम्यान टोल वसुलीबाबतही अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान, या भेटीत इथेनॉल प्रकल्पासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. पालखी मार्ग हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा मार्ग असल्याने या कामांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या घडामोडीतून मिळत आहे. गडकरी यांच्या प्रस्तावित पाहणीमुळे रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, स्थानिक नागरिक आणि वारकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.





