Pune : गृह विभागाची निष्क्रियता वारकऱ्यांच्या जीवावर; प्रशांत जगताप यांचा आरोप

पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दौंडजवळ वारीत सहभागी झालेल्या एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने लुटल्याची घटना देखील घडली आहे. या प्रकारांवरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट निशाणा साधला आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, की गृहमंत्री फडणवीस केवळ सभा, पक्षप्रवेश आणि राजकीय खेळी यातच मग्न असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या निष्पाप वारकऱ्यांवर अत्याचार होत असतानाही गृहमंत्र्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा पांडुरंगाच्या चरणी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.




