Nitin Gadkari : “चांगल्या रस्त्यांमुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होईल” – नितीन गडकरी

Nitin Gadkari : रस्त्यांच्या विस्तारांनी रोजगार आणि विकास कामांना गती मिळाली. देशातील चांगल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा खर्च कमी झाल्याचा अहवाल आयआयएम बेंगळुरू, आयआयटी, चेन्नई आणि कानपूरने सादर केला आहे.
आधी देशातील मालवाहतुकीचा खर्च १६ टक्के होता. त्या तुलनेत चीनचा ८ तर, अमेरिकेचा १२ टक्के होता. आपल्याकडे ४ ते ६ टक्क्यांनी खर्च कमी झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सद्यस्थितीत हा खर्च १० टक्के असून डिसेंबर अखेरपर्यंत ९ टक्क्यांपर्यंत हा खर्च आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी पत्रकार परिषदेत म्हणाले.
अकरा वर्षांत झालेला विकास यापूर्वी कधीही एवढ्या वेगाने झाला नाही. आम्ही कोणताही दावा करत नाही तर, केलेल्या कामांची माहिती देत आहोत. पाणी, वीज, परिवहन आणि कम्युनिकेशन या चार क्षेत्रांचा विकास महत्त्वाचा आहे. सात ग्रीन एक्स्प्रेस वे तयार करण्यात आले.
उड्डाणपूल बांधले. बंदरांपर्यंतची दळणवळण यंत्रणा बळकट केली. याचा परिणाम मालवाहतुकीच्या खर्चावर देखील झाला आहे. मालवाहतुकीचा खर्च कमी झाल्यास निर्यात देखील वाढण्यास मदत होत आहे. येत्या डिसेंबरपर्यंत दीडपट निर्यात वाढू शकेल, असा अंदाज देखील गडकरी यांनी व्यक्त केला.
चांगल्या रस्त्यांमुळे धार्मिक पर्यटन वाढले आहे. प्रयागराज कुंभमेळ्यात स्वतःच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. अन्य धार्मिक स्थळांना भक्तांच्या भेटी वाढल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढला आहे.
तब्बल २२ हजार कोटी रुपयांचे बुद्धिस्ट सर्किट तयार करण्यात आले. सात ते आठ जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांना सर्किटमध्ये जोडण्यात आले, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.





