नितेश राणे म्हणाले,”आयुक्त साहेब, शिवसेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना”

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहिले आहे. या पात्रातून त्यांनी शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेतील प्रस्तावातील गैरव्यवहारांवर नितेश राणे यांनी बोट ठेवले आहे. यासाठी त्यांनी आयुक्तांना पात्र लिहिले आहे.
कुठल्या परिस्थितीत निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये अशी खोचक टीका राणे यांनी या पत्रातून केली आहे. शिवसेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत असल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला आहे. “मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे.
महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेले परंतु समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे कामकाज पहाणारे विमल अगरवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिस्कटल्याने काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही, असे एकूण १२३ प्रस्ताव होते. सदरचे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. तथापि आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाही,” असे नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
“भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले. त्यानंतर बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी आठ प्रस्तावांना मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु आपण स्वत: आयुक्त आहात आणि प्रशासकही आपणच आहात. स्थायी समितीने बोलणी फिसकटलेले प्रस्ताव आपण निवडक पद्घतीने मंजूर करत आहात त्यामुळे मागे सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचारी सेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत आहे आणि तरीही काही निवडक प्रस्तावांनाच आपण मान्यता देण्याच्या आपल्या कार्यपद्धतीमुळे आपली प्रतिमासुद्धा मलीन होत आहे,” असे राणे म्हणाले आहेत.





