सिंधुदुर्ग : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून जगभरातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर, भारतानेही हल्ल्यानंतर पाकिस्तानला थेट इशारा देत मोठे निर्णय घेतले आहेत. त्याच अनुषंगाने राजकीय नेते आणि मंत्रीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर थेट टीका केली. तसेच, हे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आहे, पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, असा धडा शिकवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. २०१४ नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही, हे गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही, हे मोदीजींचे केंद्र सरकार आहे. २०१४ च्या नंतर आपल्या देशाकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेले आहे, असे राणे म्हणाले. तेव्हा त्यांनी का राजीनामा दिला ? शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे, असा प्रश्न नितेश राणेंना विचारण्यात आला होता. त्यावर, शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता. भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार. त्याचा मालक ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का. त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय, असे म्हणत राजीनाम्याच्या प्रश्नावर राणेंनी संजय राऊतांवर पलटवार केला.