मुंबई : कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. यासंदर्भात मी संबंधीत मंत्र्यांशी चर्चा केली असून माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असे मंत्र्यांनी मला सांगितले आहे. मात्र, राजकारणामध्ये तुमच्या मनात काहीही असले तरी, अशा वाक्यांचा अर्थ समाजात कसा जातो, ते अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांनी असे बोलणे अपेक्षित नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नितेश राणेंच्या धाराशिव येथील वक्तव्यावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राणेंच्या विरोधात तक्रार केली होती. धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्यात भाजपाचे सरकार असल्याचे लक्षात ठेवावे, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य केले होते. त्यांचा रोख स्थानिक शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांना होता. त्यावरून शिंदे गटातील नेत्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आज मंत्रीमंडळ बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत मंत्री नितेश राणे यांना जाहीरपणे समज दिली आहे.