Nissanचं भारतात जोरदार कमबॅक होणार: ‘टेक्टॉन’ एसयुव्ही लवकरच बाजारात, १ लाख विक्रीचा आत्मविश्वास

नवी दिल्ली – निस्सान कंपनी अधिक कार्यक्षम उत्पादने सादर करून भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतीय प्रकल्पामध्ये कंपनीची टेक्टॉन नावाची नवी एसयुव्ही विकसित केली जात आहे.
भारतात तयार करण्यात येत असलेली ही कार जगासाठी ही तयार केली आहे. त्यामुळे भारतात विक्री करण्याबरोबरच या कारची निर्यात केली जाईल असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की टेक्टॉन ही कार मध्यम स्वरूपाची एसयूव्ही आहे. आम्ही या क्षेत्रात अगोदरच कार्यरत असलेल्या मारुती सुझुकी, स्कोडा, ह्युंदाई या कंपन्यांबरोबर स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास बाळगून आहोत. भारतीय वातावरणाचा विचार करून ही कार विकसित करण्यात आली आहे. या कारचे प्रायोगिक उत्पादन सुरू असून पुढील वर्षी देशांतर्गत बाजारपेठेत आणि निर्यातपेठेत किमान एक लाख कार विकल्या जातील असा दावा त्यांनी केला.
ही कंपनी जागतिक पातळीवर पुन्हा अधिक ताकतीने आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की मॅग्नाइट कार ब्राझीलमध्ये अगोदर विकली जात नव्हती. मात्र आता आमच्या उत्पादन क्षमतेपेक्षा तेथे जास्त मागणी आहे. असाच प्रकार टेक्टॉन बाबतही होऊ शकतो असे ते म्हणाले.





