निशिकांत दुबेंच्या मराठीविरोधी विधानाने वादंग! म्हणाले आपल्या घरात तर कुत्राही वाघ; आदित्य ठाकरे संतापले…

Aditya Thackeray | Nishikant Dubey | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी-अमराठी वादावरून झालेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विधानसभेतही मराठी भाषेच्या मुद्यावरून पडसाद पाहायला मिळाले आहेत. अशातच भाजप खासदाराने महाराष्ट्राबाबत अत्यंत घृणास्पद आणि हीन दर्जाचे विधानं केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी जनतेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानाचा महाराष्ट्रातून अत्यंत तीव्र शब्दांत निषेध नोंदविला जात आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी दुबेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. पुढच्या काही दिवसांत भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या ‘प्लेबूक’ जाळ्यात अडकू, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
हिंदी भाषकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्राही वाघ असतो, अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
पण सावध राहा, हीच भाजपची नीती आहे. जर भाजपने कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्रविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे, अशा घणाघाती शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
दुबेंचे वादग्रस्त विधान
निशिकांत दुबे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात द्वेष निर्माण झाला आहे. याआधीही दुबेंच्या अनेक विधाने वादग्रस्त राहिलेली आहेत. मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असे हीन दर्जाचे विधाने त्यांनी महाराष्ट्राविषयी केले होते. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. एवढ्यावरच न थांबता दुबे पुढे म्हणाले, “मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत? मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा? खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?”
कोण आहेत निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे हे भाजपचे लोकसभेतील खासदार आहेत. २००९ मध्ये त्यांनी गोड्डा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली होती आणि ते विजयी झाले. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
हेही वाचा : पाटण्यात एन्काऊंटर…! गोपाल खेमका हत्याकांडासाठी शस्त्रे पुरवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार





