महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील 70 मल्लांना नऊ लाखांची बक्षिसे

सातारा – साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षीसपात्र 70 मल्ल, महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लांना मिळून नऊ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा तालीम संघाचे प्रमुख मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक मिळकतीतून ही बक्षिसे या मल्लांना देण्याच्या निर्णयाची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार, सुधीर पवार, तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. साहेबराव पवार म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सहकार्याने जिल्हा तालीम संघाच्या संचालकांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले.
संचालकांनी रात्रीचा दिवस करून उत्तम संयोजन केले. राज्य कुस्ती परिषदेच्या संकेतांनुसार आणि नियमांस आधीन राहून, तब्बल 63 वर्षांनंतर साताऱ्यात या स्पर्धेचे आयोजन केले. तालीम संघाच्या सदस्यांनी नेटकेपणाने स्पर्धा पार पाडून साताऱ्याचा नावलौकिक राखला आहे; परंतु स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाने बक्षिसाची रक्कम न मिळाल्याची खंत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. त्याची सल होती. त्यामुळेच माझ्या वैयक्तिक मिळकतीतून नऊ लाख रुपयांची बक्षिसे मल्लांना देण्याचा निर्णय मी घेतला आहे.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला एक लाख 20 हजार रुपये, उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरला 70 हजार रुपये, याशिवाय माती आणि गादी गटातील विजेत्या प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांनुसार 70 मल्लांनी बक्षीसपात्र कामगिरी नोंदवली. सुवर्णपदक विजेत्याला 20 हजार, रौप्यपदक विजेत्याला दहा हजार आणि कांस्यपदक विजेत्याला पाच हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या बक्षिसांचे धनादेश तयार करण्यात आले आहेत. त्या त्या जिल्ह्यातील क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, त्यांच्यामार्फत हे धनादेश त्या मल्लांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात एवढी मोठी बक्षिसे यापूर्वी कोणत्याही संयोजकांनी दिलेली नाहीत, असे दीपक पवार व सुधीर पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या खर्चाचे ऑडिट व्हावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात विचारले असता, दीपक पवार म्हणाले, जिल्हा तालीम संघाने लोकवर्गणीतून हा खर्च केला आहे. कुस्तीगीर परिषद आणि जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेली प्रशासकीय मदत वगळता प्रशासनाने एक रुपयासुद्धा खर्च केलेला नाही. याबाबत वेगळा प्रचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू. दरम्यान, या खर्चाबाबत शंका असलेल्यांच्या समोर सर्व हिशोब सादर करण्याची तयारी असल्याचे सुधीर पवार यांनी सांगितले.





