Pune District : 2025 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा इंदापुरात होणार

इंदापूर : लाल मातीशी इनाम राखणारा इंदापूर तालुका असून 2025 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा इंदापूर तालुक्यात होईल. अशी घोषणा, राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. इंदापूर तालुक्यातील गोखळी तरंगवाडी येथील गुरुकुल विद्या मंदिर प्रांगणात, गुरुकुल केसरी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान नुकतेच रोजी, राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, तसेच गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मल्लांच्या उपस्थितीत यशस्वी कुस्ती मैदान पार पडले.
यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ, आखाडा प्रमुख पै. चेअरमन बाळासाहेब चितळकर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. नवनाथ तरंगे, उपसरपंच पै. महादेव शिंदे, पै. सुहास बुट्टे, पै. तानाजी चितळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष पै. लेमन गावडे, यांनी उपस्थितांचा सन्मान केला. आमदार बाबासाहेब देशमुख, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, श्रीमंत ढोले, पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गुरुकुल केसरीची गदा मामासाहेब तरंगे मानकरी ठरले.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कुस्ती क्षेत्रात इंदापूर तालुका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त पैलवान असणारा, नाद असणारा तालुका इंदापूर आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा क्रीडामंत्री म्हणून काम करतोय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आमदार झालो आणि राज्याचा क्रीडामंत्रीही झालो. मी कारभार चालवताना कधीही रुबाब करत नाही, शेवटी या पदाचा उपयोग लोकांसाठी करण्याचा प्रयत्न माझा कायम असतो. त्यामुळे गोखळी येथील गुरुकुल विद्या मंदिर संस्थेला शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली जाईल.
या निकाली कुस्तीच्या मैदानात पै. सागर देवकाते कोल्हापूर विरुद्ध पै. दत्ता बोडरे मगराचे निमगाव, तर पै. अंकुश खरात पुणे विरुद्ध पै. अभिजीत जगदाळे कंदर, तसेच पै. मामासाहेब तरंगे तरंगवाडी विरुद्ध पै. सागर काळेबाग काटी, व पै अनिल कचरे इंदापूर विरुद्ध पै. नाथा पवार बेनापुर अशा शेकडो राज्यातील नामांकित मल्लांच्या लढती झाल्या. कुस्ती निवेदक प्रवीण ठवरे, प्राध्यापक शरद झोळ, अशोक धोत्रे, सुभाष दिवसे यांनी केले.





