Maharashtra Kesari Competition : शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षांसाठी निलंबन

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.
पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी
या स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. तर महेंद्र गायकवाड हा उपमहाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षांसाठी निलंबन
अंतिम सामन्यानंतर महाराष्ट्र्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करत ३ वर्षांसाठी निलंबन केले आहे.
सामन्यानंतर गोंधळ
या स्पर्धेमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. अंतिम सामन्यातदेखील गोंधळ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.





