पुणे जिल्हा : मुळशीतील पैलवान उतरले निवडणुकीच्या आखाड्यात

आमदार संग्राम थोपटे यांचे मैदान गाजवणार
भोर – भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील कुस्ती पैलवान विधानसभा निवडणुकिच्या आखाड्यात उतरले आहेत. आमदार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी त्यांनी लंगोट बांधून विरोधकांना छोबीपीछाड डाव करुन चितपट करण्याचा निर्णयच घेतला असल्याचे भूगाव, भुकूममधील कुस्तीगीर पैलवानांनी सांगितले.
महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांना मुळशीतील पैलवान मंडळींनी साथ दिली आहे. काँग्रेसच्या प्रचारात भूगाव व भुकूमसह तालुक्यातील कुस्तीगीर आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशीतील प्रचाराच्या पहिल्या फेरीत दोन दिवसांत 38 गावांत झंझावाती दौरा केला. मुठा खोरे, कोळवण खोर्यात नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर प्रचाराचा शेवट भुकूमनंतर भूगाव येथे झाला.
कुस्तीगीरांचे गांव अशी ख्याती असलेल्या याच गावातील पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. हे यशस्वी आयोजन केलेले कुस्तीगीर आता संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भूगावचे ग्राम मंदिरात झालेल्या प्रचार सभेत पै. दगडूकाका करंजावणे, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे मा. अध्यक्ष शिवाजी तांगडे, पै. गोविंद मिरगे, पै. राहुल शेडगे, रमेश सणस, पै. स्वस्तिक चोंधे, पै. जमनादास इंगवले, बाजीराव खाणेकर, भालचंद्र चोंधे, नारायण करंजावणे, निवृत्ती शेडगे, भालचंद भिलारे यांच्यासह भुकूमधील तरूण कुस्तीपटूसह मुळशीतील क्रीडाक्षेत्रील खेळाडू, संघटक व प्रशिक्षकांनी आमदार थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी पै. दगडूकाका करंजावणे, शिवाजी तांगडे, राहुल शेडगे, रमेश सणस, पै. स्वस्तिक चोंधे यांनी प्रचरारात सहभाग घेतला आहे.
मुळशीतील भरे येथील क्रीडा संकुल व कुस्ती अॅकॅडमी सुरू करण्यासाठी 3 कोटींचा निधी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी मंजूर केला आहे. कुस्तीगीर पैलवानांना कायम सहकार्य केल्याबद्दल कुस्तीगीरच नव्हे तर संपूर्ण तालुका आमदार थोपटे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे राहूल शेडगे यांनी सांगितले. विधानसभेेच्या कुस्तीत संग्राम थोपटे यांना साथ देण्याचा निर्धार दगडूकाका करंजावणे यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला.
——-





