Nilesh Ghaywal : नीलेश घायवळवर इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस ; लवकरच रेड कॉर्नरही शक्य

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोथरूडमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश घायवळ ( ४९) याच्यावर शनिवारी इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. ही नोटीस आंतरराष्ट्रीय पातळीवरील फरारी व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वापरली जाते.नीलेश घायवळसह ११ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील वादग्रस्त पिस्तूल परवान्यामुळे नीलेशचा भाऊ सचिन घायवळ यालाही आरोपी केले आहे.
नीलेश घायवळ ९ सप्टेंबर रोजी देशाबाहेर पळून गेला असून, त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलकडे विनंती केली होती.पुणे पोलीस परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत सांगितले की, घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच एक गुन्हा दाखल आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत नीलेशने आपला पासपोर्ट पोलिसांकडे न देता परदेशात निघून गेला आहे.
यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आउट सर्क्युलर जारी केले. तसेच इंटरपोलकडे ब्लू कॉर्नर नोटीससाठी विनंती केली होती. ब्लू कॉर्नर नोटीसनंतर त्याचा ठावठिकाणा आढळल्यास, गंभीर गुन्ह्यांसाठी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट (रेड कॉर्नर नोटीस) जारी होऊ शकते.





