Nigdi Bus Depot : निगडी बस स्थानकात प्रवाशांचा संताप; बस उशिराने येत असल्याने नागरिक त्रस्त
Nigdi Bus Depot : निगडी बस स्थानकात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल.

Nigdi Bus Depot – पीएमपीएमएलच्या निगडी बस स्थानकात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी बस उशिराने येत असल्याने प्रवाशांची बसस्थानकात मोठी गर्दी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे प्रवाशांची खूप मोठी संख्या असतानाही प्रवाशांना सावलीसाठी शेड, पाणी अशा अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
नोकरी, शिक्षण तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज तास न तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही मार्गांवरील बस कमी प्रमाणात धावत असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. बस उशिरा येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून अनेकांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. विशेषतः कार्यालय सुटण्याच्या वेळेत बसस्थानकावर महिलां, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.
बसची निश्चित वेळ नसल्याने प्रवाशांना उन्हात व धुळीत थांबावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. “बसचे नियोजन योग्य पद्धतीने करावे, तसेच गर्दीच्या वेळेत अतिरिक्त बस सोडाव्यात,” अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





