Alandi News : भर उन्हात उभे राहून बसची वाट बघायची? आळंदीत नवीन बस स्थानकावर निवार्याची वानवा
Alandi News : आळंदीतील नदीपलीकडील नवीन पीएमपीएमएल स्थानकावर निवार्याची वानवा; वाढत्या उन्हामुळे शालेय मुले आणि ज्येष्ठांचे प्रचंड हाल.

Alandi News – नदीपलीकडील एसटी महामंडळाच्या जागेतील नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएल बस स्थानकावर कर्मचारी व प्रवाशांसाठी पुरेशा निवार्याची व्यवस्था नसल्याचे चित्र समोर आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना कर्मचार्यांना आणि प्रवाशांना भर उन्हातच थांबावे लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बस स्थानकावर कार्यरत असलेले कर्मचारी तसेच प्रवास करून आलेले वाहनचालक व वाहक (कंडक्टर) यांनाही उन्हात उभे राहण्याची वेळ येत आहे. बस स्थानकावर कर्मचार्यांसाठी पुरेशी सावली व बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बस स्थानकावर येणार्या प्रवाशांसाठीही बसण्याची सुविधा अपुरी असल्याचे दिसून येत आहे.
शालेय विद्यार्थी व कामगार नागरिकांची गर्दी झाल्यानंतर त्यांना उन्हात उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानकावर वाहने ये-जा करताना मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे श्वसनाच्या आजारांसह इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊन, वारा व पावसापासून कर्मचारी तसेच प्रवाशांचे संरक्षण व्हावे यासाठी बस स्थानकावर तातडीने पुरेशा निवार्याची व बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली जात आहे.





