Nhavare : न्हावरेत कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या; वनविभागाने सुरक्षित पकडले
Nhavare : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील कांडगेवस्तीवर भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला. वनविभागाने त्याला सुरक्षित पकडले.

Nhavare : भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या चक्क कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याची घटना शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील कांडगेवस्तीवर घडली. बुधवारी (दि. २५) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.
बाळासाहेब जगदाळे यांच्या घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सुमारे दोन ते अडीच वर्षांचा बिबट्याचा बछडा शिरला. मात्र, बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने तो आतच अडकला. कोंबड्यांचा आवाज ऐकून जगदाळे कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली.
वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्याला पुढील देखभालीसाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, परिसरातील बिबट्यांचा वावर पुन्हा चर्चेत आला आहे.





