NHAI 1033 Helpline : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 1033 वर फोन केल्यास तात्काळ मिळणार ‘ही’ मदत
NHAI 1033 Helpline : NHAIची 1033 हेल्पलाइन आधुनिक होणार. AI, रिअल-टाइम GPS आणि स्मार्ट मदत प्रणालीमुळे अपघात किंवा वाहन बिघाडाच्या वेळी महामार्गावर जलद मदत मिळणार.

NHAI 1033 Helpline : राष्ट्रीय महामार्गांवर अपघात किंवा वाहन बिघाडाच्या वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 1033 हेल्पलाइन अधिक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी याबाबतची माहिती देण्यात आली. नव्या व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिअल-टाइम जीपीएस लोकेशन आणि स्मार्ट आपत्कालीन मदत प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
या सुविधेमुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणारे वाहनचालक, बस प्रवासी आणि मालवाहतूकदारांना फायदा होणार आहे. अपघात किंवा वाहन बंद पडल्यास मदत मागणाऱ्या व्यक्तीला आपले नेमके ठिकाण सांगण्यासाठी किलोमीटरचा दगड किंवा जवळचा टोल नाका शोधण्याची गरज कमी होईल.
AI स्वतः ओळखणार कॉल करणाऱ्याचे ठिकाण –
नव्या 1033 हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर प्रणाली रिअल-टाइम जीपीएसच्या मदतीने कॉल करणाऱ्याचे भौगोलिक ठिकाण ओळखेल. त्यामुळे मदत पथकाला घटनास्थळी पोहोचणे अधिक सोपे होईल.
तसेच विविध भारतीय भाषांमध्ये होणारे संभाषण समजून घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे भाषेची अडचण कमी होऊन प्रवाशांना आपली समस्या सहज सांगता येईल.
अपघाताच्या गांभीर्यानुसार मदत पाठवली जाणार –
घटनेची माहिती आणि गांभीर्य लक्षात घेऊन स्मार्ट प्रणाली कोणती मदत आधी पाठवायची, हे ठरवण्यास मदत करेल. त्यानुसार रुग्णवाहिका, महामार्ग गस्त वाहन किंवा मोठी क्रेन घटनास्थळी पाठवली जाऊ शकते. मात्र मानवी निर्णय आणि संवेदनशीलता आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये हेल्पलाइनवरील कर्मचारी निर्णय घेतील.
कॉल सेंटरची नवी व्यवस्था कशी असेल?
NHAIच्या नियंत्रणाखालील इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (IHMCL) नव्या पिढीतील 1033 हेल्पलाइन आणि कॉल सेंटरसाठी कंपन्या व त्यांच्या समूहांकडून प्रस्ताव मागवले आहेत. या व्यवस्थेची निर्मिती, रचना, संचालन आणि देखभाल करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
सध्याच्या व्यवस्थेत अपघातग्रस्त व्यक्तीला महामार्गावरील किलोमीटर क्रमांक किंवा जवळचा टोल नाका सांगताना अडचणी येतात. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. नव्या व्यवस्थेत रुग्णालये, पोलिस, महामार्ग देखभाल पथक आणि हेल्पलाइन यांच्यात रिअल-टाइम समन्वय साधला जाणार आहे.
याशिवाय महामार्गावर पुढे मोठा अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास प्रवाशांना डिजिटल संदेश आणि अलर्टद्वारे आधीच सावध करण्याची सुविधाही या प्रणालीत असणार आहे.





