Satara: वृत्तपत्र विक्रेत्यांचे सातार्यात आंदोलन
Satara वृत्तपत्र वितरण व्यवस्थेतील हा महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे महामंडळाची स्थापना करून त्याच्या माध्यमातून विक्रेत्यांना आवश्यक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Satara: वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी घोषित करण्यात आलेल्या वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी सातार्यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी आंदोलन केले. सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेते व एजंट संघटना तसेच कराड तालुका वृत्तपत्र संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर प्रकरण पुढे सरकले नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हे निवेदन देण्यात आले आहे. 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर जवळपास दोन वर्षे उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही, वृत्तपत्र विक्रेते दररोज पहाटेपासून ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्रे पोहोचविण्याचे काम करतात. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेतील हा महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे महामंडळाची स्थापना करून त्याच्या माध्यमातून विक्रेत्यांना आवश्यक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी, सचिव गणेश पवार, उपाध्यक्ष ताजुद्दीन आगा, गिरीश वैद्य, जावेद काझी, लहूराज लवळे, विकास क्षीरसागर, सतीश गाडे, महेश पवार, गणेश जायगुडे, चंद्रकांत गायकवाड, रमेश जाधव, विनोद शिंदे, विजय भुरावणे, हमीद खान, शाम पाटोळे, संतोष फरांदे, सतीश धडवई, समाधान भोसले यांच्यासह सातारा व कराड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते.





