Satara: शनिवारी वाईत उद्योग संवाद मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चार मंत्र्यांची उपस्थिती
Satara ‘एकजुटीतून समृद्धी, विचारांतून प्रगती आणि उद्योजकतेतून सातार्याचा विकास’ या ध्येयाने आयोजित करण्यात आलेला हा उद्योग संवाद मेळावा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

Satara: जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर यांच्या वतीने वाई येथे शनिवार, दि. 28 रोजी ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत या भव्य ‘उद्योग संवाद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. यशवंतनगर, सोनगीरवाडी येथील मनुरा अॅग्रो टुरिझम येथे दुपारी 3 वाजता हा मेळावा होणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील चार मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, महेश शिंदे आणि मनोजदादा घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्योग आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधी, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, व्यवसायविस्तार, आधुनिक तंत्रज्ञान, ग्रामीण भागातील उद्योगनिर्मिती, रोजगाराच्या संधी आणि शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक उपाययोजना यावर या मेळाव्यात विचारमंथन होणार आहे. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी यांना आपले अनुभव, यशोगाथा आणि समस्या मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मंगावे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, ट्रस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मांडलेचा, उपाध्यक्ष डॉ. धनश्री हरदास, डॉ. संतोष राणे, सुनीता फाल्गुने, महेंद्र अग्रवाल, सुनील किर्दक, सर्जेराव नलावडे, संजय शेठ, सिद्धार्थ रहाटिया, विशेष निमंत्रित वेदांशु पाटील आणि सरकार्यवाह सुरेश घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्याचे निमंत्रक म्हणून उपाध्यक्ष किरण भोसले, कार्यकारिणी मंडळाचे सदस्य मयूर मोरे आणि शैलेश जाधव कार्यरत आहेत.
‘एकजुटीतून समृद्धी, विचारांतून प्रगती आणि उद्योजकतेतून सातार्याचा विकास’ या ध्येयाने आयोजित करण्यात आलेला हा उद्योग संवाद मेळावा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, युवक आणि नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने करण्यात आले आहे.





