वैष्णवीचं लग्न ते 11 महिन्यांच्या बाळाचा ताबा…., संपूर्ण घटनाक्रम वाचा

पुणे : पिंपरी येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या असह्य छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पुणे शहर हादरले असून, वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवीच्या 11 महिन्यांच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना गुंडगिरी आणि प्रशासकीय उदासीनतेचा सामना करावा लागला. अखेर माध्यमांच्या दखल आणि राजकीय दबावानंतर बाळ आजी-आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले.
लग्नापासून आत्महत्येपर्यंतचा घटनाक्रम –
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह 28 एप्रिल 2023 रोजी थाटामाटात पार पडला. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हुंडा म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी 51 तोळे सोने आणि जावयाला फॉर्च्युनर कार दिली. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सासू, सासरे, नणंद, दीर आणि चक्क पती शशांक यांच्याकडून वैष्णवीचा छळ सुरू झाला. 21 जुलै 2024 रोजी वैष्णवीने मुलाला जन्म दिला, परंतु बाळाच्या जन्मानंतरही छळ थांबला नाही. बाळाबाबतही संशय व्यक्त केल्याने वैष्णवी मानसिकदृष्ट्या व्यथित झाली. अखेर, 16 मे 2025 रोजी तिने हगवणे यांच्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कुटुंबाची धावपळ –
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 11 महिन्यांच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 20 मे रोजी शशांक यांचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे यांनी वैष्णवीच्या मामांना फोन करून बाळ रडत असल्याचे सांगत त्याला घेऊन जाण्यास सांगितले. कस्पटे कुटुंबीय कर्वेनगर येथील दिलेल्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा ते घर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समजले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चव्हाणने पिस्तूलाचा धाक दाखवत बाळ देण्यास नकार दिला आणि कुटुंबीयांना हुसकावून लावले.
कस्पटे कुटुंबीयांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु हद्दीचे कारण सांगत त्यांना बावधन पोलिसांकडे पाठवण्यात आले. बावधन पोलिसांनीही सहकार्य नाकारत बाळाचा ताबा न्यायालयातून घेण्याचा सल्ला दिला.
अखेर बाळ आजी-आजोबांकडे –
गुरुवारी (22 मे) सकाळी 10 वाजता वैष्णवीचे काका मोहन कस्पटे आणि मामा उत्तम बहीरट पुन्हा निलेश चव्हाणच्या घरी बाळाला आणण्यासाठी गेले, परंतु दरवाजा उघडला गेला नाही. त्याचवेळी त्यांना फोनवरून बाळ पिरंगुट येथील पोवळे कुटुंबाकडे असल्याची माहिती मिळाली. पिरंगुटला निघालेल्या मोहन कस्पटे यांना अर्ध्या वाटेत पुन्हा फोन आला आणि पुणे-बेंगलोर महामार्गावर येण्यास सांगण्यात आले. तिथे एका अज्ञात व्यक्तीने बाळ मोहन कस्पटे यांच्याकडे सुपूर्द केले. दुपारी 12 वाजता मोहन कस्पटे बाळाला घेऊन घरी पोहोचले.
महिला आयोग, माध्यमे आणि प्रशासनाची भूमिका
वैष्णवीच्या मृत्यूनंतर आणि बाळाच्या ताब्यासाठी कुटुंबीयांना झालेल्या त्रासानंतर माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतली. यामुळे राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाला जाग आली. महिला आयोगानेही या प्रकरणात लक्ष घातले. अखेर वैष्णवीचे बाळ तिच्या आई-वडिलांकडे, म्हणजेच आजी-आजोबांकडे, सुखरूप सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांत गुन्हा दाखल
वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबीयांवर छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून, समाजात हुंडा आणि सासरच्या छळाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.



