सांगलीत भाजपला धक्का: माजी नगराध्यक्षांसह तिघांनी बांधलं शिवबंधन
Updated On:

तासगाव – तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी आणि सावर्डे गावचे सरपंच तथा महाराष्ट्र सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रदीप माने यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
या तिघांनी मुंबईत मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील व जिल्हाप्रमुख विभूते यांसह अनेकजण उपस्थित होते.
2021 ला तासगाव नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तसेच तालुक्यातील 39 गावात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच या तिघांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणे भाजपासह खासदार संजय पाटील यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे.





