Pune Mansoon Rain: पुण्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पहिल्याच पावसात रस्त्यांवर कमरेएवढे पाणी; Flashflood सारखी स्थिती

Pune Mansoon Rain: आज शनिवारी (दि. 8) पुणे शहर परिसरात मान्सूनचे आगमन झाले. यावेळी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरात सायंकाळी 5 वाजताच अंधारुन आले होते. काही वेळातच जोरदार पाऊस होऊन शहरातील विविध भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही भागातील रस्त्यांवर कमरेएवढे पाणी साचले असून वाहतूककोंडी, घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे.
दरम्यान, पुणे शहरावर उंच ढगांची निर्मीती झाली आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडत आहे. पाच वाजता सुरु झालेला पाऊस सहा वाजेपर्यंत संततधार सुरु होता. पुढील आणखी एक तास पाऊस सुरु राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुण्याच्या उत्तर-पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली.
7 Days Forecast for Pune City and Neighbourhood@Hosalikar_KS pic.twitter.com/MVWTa6ap31
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) June 8, 2024
अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी –
जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने बंद पडली. रस्त्यांशेजारील दुकाने, घरांमध्येही अनेक भागात पाणी साचले. शहरातील सकाळ नगर, सिंहगड रोड, कोथरूड, आदी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुणे शहरातील पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
दरम्यान, महाराष्ट्रात 6 जून रोजी मॉन्सूननं हजेरी लावली असून दोन दिवसांत अधुनमधून साधारण पाऊस कोसळत होता. पण आज पावसानं पुणे शहरांसह परिसरात चांगली हजेरी लावली. तसंच पुढील आठवड्याभरात पुण्यात पाऊस कसा असेल? याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून, कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती, तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे, आदी घटना शक्य आहेत. पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
आठवडाभर पुण्यात कसा असेल पाऊस –
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 9 ते 14 जून या काळात ढगाळ वातावरण राहणार असून साधारण पाऊस असणार आहे. यांपैकी उद्या 9 जूनला ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यांतर 12 ते 14 या तीन दिवसांच्या काळात दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस बरसू शकतो असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.





