मोदींनी प्रामाणिकपणे महाराष्ट्राला गुजरातपेक्षा जास्त मदत दिली पाहिजे – भाजप खासदाराची मागणी

नवी दिल्ली – तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातपेक्षा महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यांना जादा मदत दिली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी केवळ गुजरात राज्याचा पाहणी दौरा करून त्या राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यांच्या या दुजाभावाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी जाहीर टीका केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी गुजरातला मदतीचा धनादेश दिला. पण त्यांनी आता प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या कारभारावर याही आधी अनेक वेळा जाहीर टीका केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कारभारावरही त्यांनी अनेक वेळा जाहीर टीकास्त्र सोडले आहे.





