Nashik Accident: वळणावर रस्ता संपला अन् होत्याचं नव्हतं झालं; दरगोडे कुटुंबातील 9 जणांच्या दुर्दैवी अंताचं कारण समोर
Nashik Accident: या घटनेने रस्ते बांधणी करताना सुरक्षेचे नियम पाळले जातात का? रस्त्याशेजारील उघड्या विहिरी मृत्यूचे सापळे बनत आहेत का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी आता जोर धरत आहे.

Nashik Accident: एका बाजूला स्नेहमिलनाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला घराची ओढ… पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगो़डे कुटुंब शनिवारी रात्री आपल्या ‘मारुती XL6’ कारने घराकडे परतत असताना, शिवाजी नगर भागात त्यांची कार रस्त्याशेजारील विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात कुटुंबातील ९ सदस्यांचा बुडून मृत्यू झाला असून, संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दरगोडे कुटुंब दिंडोरी शहरात एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर रात्री १०:२० च्या सुमारास ते घराकडे निघाले. शिवाजी नगर भागात रस्ता वळणाचा आहे. रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत कोसळली.
विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. कार कोसळताच मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र विहिरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना यश आले नाही.
बचावकार्यात आले अडथळे –
कारच्या काचा बंद असल्याने कोणालाही बाहेर पडता आले नाही. सुमारे ५ मिनिटे कार पाण्यावर तरंगत होती, पण नंतर ती तळाला गेली. ग्रामस्थांनी दोरखंडाच्या साहाय्याने मदत करण्याचा प्रयत्न केला, तसेच मोटार लावून पाणी उपसण्याचे कामही सुरू केले. घटनेच्या २० मिनिटांनंतर अग्निशमन दल दाखल झाले. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नांनंतर कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत सर्वांचा श्वास थांबला होता.
अपघाताचे मुख्य कारण: गुगल मॅप आणि रस्त्याची उंची –
प्राथमिक अंदाजानुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे वळणावर रस्ता अचानक संपल्यासारखा वाटतो. गुगल मॅपवरील फोटोंनुसार, या मार्गावर वळणाचा अंदाज येणे कठीण आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विहीर आधी झाकलेली होती. मध्यंतरी रस्त्याचे काम झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. रस्ता उंच झाल्याने विहीर आणि रस्ता एकाच पातळीवर आले, ज्यामुळे चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही.
अपघातातील मृतांची नावे –
या दुर्घटनेत रेश्मा सुनील दरगोडे (२७), आशा अनिल दरगोडे (३२), खुशी अनिल दरगोडे (१४), श्रेयस अनिल दरगोडे (११), राखी सुनील दरगोडे (११), श्रावणी अनिल दरगोडे (११), समृद्धी राजेंद्र दरगोडे (७), माधुरी अनिल दरगोडे (१३) आणि सुनील दत्तू दरगोडे (३२) यांचा समावेश आहे.
राज्य सरकारने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, ज्या विहिरीमुळे हा अपघात झाला, ती विहीर प्रशासनाकडून आता बुजवण्यात आली आहे. या घटनेने रस्ते बांधणी करताना सुरक्षेचे नियम पाळले जातात का? रस्त्याशेजारील उघड्या विहिरी मृत्यूचे सापळे बनत आहेत का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी आता जोर धरत आहे.





