महाराष्ट्र हादरला..! कार-दुचाकीच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, ३ कुटुंबांवर दुखाचा डोंगर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात घडला. अल्टो कार (क्र. MH 04 DY 6642) आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताने तीन कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा अपघात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिंडोरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील वणी रोडवरील एका नर्सरीजवळ घडला. अल्टो कार नाशिक येथे नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गांगुर्डे कुटुंबीयांना घेऊन सारसाळे (ता. दिंडोरी) येथे परतत होती.
यावेळी समोरून येणाऱ्या मोटारसायकलशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याशेजारील पाण्याच्या नाल्यात उलटली, तर मोटारसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, आणि नाल्यातील पाणी नाकातोंडात शिरल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एक दोन वर्षांचा बालक यांचा समावेश आहे. देविदास पंडित गांगुर्डे (वय २८), मनीषा देविदास गांगुर्डे (वय २३), भावेश देविदास गांगुर्डे (वय २), उत्तम एकनाथ जाधव (वय ४२,), अल्का उत्तम जाधव (वय ३८), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५)
एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मोटारसायकलवरील दोघे, मंगेश यशवंत कुरघडे (वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८), गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, कार नाल्यात उलटल्यानंतर पाणी प्रवाशांच्या नाकातोंडात शिरल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गावांवर शोककळा
या अपघातामुळे कोशिंबे, देवठाण आणि सारसाळे गावांवर शोककळा पसरली आहे. नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करून घरी परतताना काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिक हादरले आहेत.





