Narhari Zirwal : ‘…तर ९ जीव वाचले असते’; मंत्री झिरवाळ दिंडोरीमधील अपघातस्थळी येताच स्थानिक आक्रमक
Narhari Zirwal : घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली.

Narhari Zirwal : नाशिकमधील दिंडोरीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी कार थेट विहिरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला.
“जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते. आता या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?” असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, “आजचा दिवस दिंडोरीसाठी काळा दिवस आहे. एकाच कुटुंबातील 9 माणसं जाणं ही अत्यंत गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील.
विहीर मालकाने घराला कंपाउंड केलं, मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, तिथे संरक्षण भिंत असणं गरजेचं होतं.” Narhari Zirwal
नेमकं कसा झाला अपघात?
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपल्या इर्टिका कारने घराकडे परतत होते.
रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. यानंतर भरधाव कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली.
मृतांची यादी
सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32), रेशमा सुनील दरगोडे (वय 27), आशा अनिल दरगोडे (वय 32),गुणवती सुनील दरगोडे (वय 11),श्रेयश अनिल दरगोडे (वय 11),श्रावणी अनिल दरगोडे (वय 11), सृष्टी अनिल दरगोडे (वय 14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय 7), श्रद्धा अनिल दरगोडे (वय 13)
हेही वाचा:
Jamun Benefits: डायबिटीजपुरताच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी जांभूळ ठरते रामबाण!






