Satish Wagh Kidnap & Murder: आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, संध्याकाळी सापडला मृतदेह; पुण्यात खळबळ

Satish Wagh Kidnap & Murder – विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करुन खून करण्यात आला. त्यांचा मृतदेह उरूळी कांचन येथील शिंदवणे घाटात टाकण्यात आला होता. सायंकाळी उशीरा पोलिसांना मृतदेह हाती लागल्यावर खळबळ माजली. चारचाकी वाहनातून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते.
याप्रकरणी पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हडपसर आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री उशीरा हडपसर पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस पथकांना मार्गदर्शन केले. तर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे हे सकाळपासून हडपसर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
सतीश वाघ(५८, रा.फुरसुंगी सासवड रस्ता) हे सकाळी हडपसर येथील ब्लु बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. त्यावेळी अचानक एक गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. आतमध्ये अगोदरच दोघे बसले होते. यानंतर त्यांना सोलापूरच्या दिशेने नेण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
यासंदर्भात त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांची आणि गुन्हे शाखेची पथके तपास करत होती. दरम्यान वाघ यांचा मृतदेह उरूळी कांचन येथील शिंदवणे घाटात सापडला. ग्रामीण पोलिसांनी याची खबर पुणे पोलिसांना दिली. यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघ यांचा मृतदेह ओळखला.





