हडपसर : कात्रज -हडपसर मेट्रो मार्गिका त्वरित सुरू करावी ,’अहिल्या-सावित्री’ सृष्टी उभारावी , महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र पुण्यात सुरू करावे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा आणि हडपसर ते यवत या उन्नत मार्गाची व्याप्ती वाढवावी , अशा विविध पुरवणी मागण्या विधान परिषद सभागृहात आमदार योगेश टिळेकर यांनी केल्या. हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या आहेत. या मार्गामुळे हडपसरमधून मुख्य शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहेच.परंतु पहिल्या टप्प्यात कात्रज ते हडपसर ही मेट्रो मार्गिका प्राधान्याने सुरू करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली. याशिवाय एमएसआरडीसी मार्फत होणाऱ्या हडपसर ते यवत या १८ किलोमीटरच्या ४-पदरी उड्डाणपुलाचे काम ४० वर्षांनंतर होत आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र, वाहतूक कोंडीचा समूळ नाश करण्यासाठी हा पूल भैरोबानालापासून सुरू करून यवतपर्यंत न्यावा. केवळ २ किलोमीटर वाढवल्यास या भागातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल.अशी मागणीही टिळेकर यांनी केली.तर,संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पुण्यात येतात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुण्यात केंद्र महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र मिळावे, असेही त्यांनी सभागृहाला सुचविले. २०१२ साली पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ९ एकर जागेवर भव्य क्रीडांगण सुरू केले. मात्र, दुर्दैवाने आजपर्यंत या प्रकल्पाला शासनाकडून एका रुपयाचाही निधी मिळालेला नाही. आपल्या युवा पिढीसाठी आणि खेळाडूंसाठी या क्रीडा संकुलाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच कात्रज-कोंढवा मतदारसंघातील मोकळ्या जागेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला समर्पित ‘अहिल्या-सावित्री सृष्टी’ उभारावी. हा प्रकल्प आपल्या पुढच्या पिढीला या महान व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी वारसा देईल.याकडे सभागृहाचे लक्ष आमदार टिळेकर यांनी पुरवणी मागण्या करताना वेधले. सावता महाराज समाधी सोहळ्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आषाढी सोहळ्यानिमित्ताने विविध संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला गेल्या आहेत.परंतु, पांडुरंगाच्या पादुका अरण येथे संत सावता महाराज यांच्या भेटीला जातात. संत सावता महाराज यांचा समाधी सोहळा २० जुलैला अरणमध्ये होत आहे. दोन दिवसांच्या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. यामध्ये काशी कापडी समाजाला पालखीचा मान असतो. पांडुरंगाच्या पालखीचे नियोजन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने करावे, अशी मागणी पंढरपूर येथे हरताळे दिंडी मठात संत सावता महाराज धर्मदाय न्यास व भाविकांनी केली आहे. याचा खर्च मंदिर व्यवस्थापनाने करावा, असा आदेश विधानसभा सभापतींनी द्यावेत, अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषेदत केली. जर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने खर्च उचलल्यास सर्व नियोजन व्यवस्थित होईल आणि भाविकांना त्याचा फायदा होईल, त्यामुळे हे निर्देश देणे आवश्यक आहेत, असे टिळेकर यांनी सभागृहात नमूद केले.