Politics News : महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप; जिल्हाध्यक्षांची तडकाफडकी हकालपट्टी, नंतर 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Politics News :

Politics News : रायगड जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्याने पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा भडका उडाला असून तब्बल ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
कारवाईमागील कारणे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा –
रायगड जिल्हा काँग्रेसची उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत विभागणी करण्याच्या निर्णयानंतर पक्षात अस्वस्थता वाढली होती. त्यातच महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्षपदावरून अचानक हकालपट्टी करण्यात आल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे. घरत यांचे भाजप नेते रामशेठ ठाकूर यांच्याशी असलेले संबंध तसेच जिल्हा विभाजनाबाबत त्यांनी व्यक्त केलेली नाराजी या कारवाईमागील कारणे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे –
दरम्यान, घरत यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविलेल्या नावालाही पक्षश्रेष्ठींनी डावलल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्यासह ५० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले.
हेही वाचा – उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
या घडामोडींनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रायगड जिल्ह्यासाठी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड दौऱ्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून महेंद्र घरत पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





