LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला; ग्रामीण भागात आता ‘इतक्या’ दिवसांनंतरच होणार बुकिंग
LPG Cylinder Booking Rule : यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी २१ दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडेच २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता मात्र ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे.

LPG Cylinder Booking Rule : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात हा कालावधी २५ दिवसांचा असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली.
आधीचे नियम काय होते?
यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी २१ दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडेच २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता मात्र ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे.
अफवांमुळे वाढली होती घाईची बुकिंग
गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा खूप आधीच सिलेंडर बुक करू लागले होते. जे ग्राहक साधारणपणे ५५ दिवसांनी बुकिंग करत होते, ते केवळ १५ दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागले. यामुळे पुरवठ्यावर अचानक मोठा दबाव निर्माण झाला होता. हा दबाव कमी करण्यासाठीच बुकिंग कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले.
एलपीजी उत्पादनात २८ टक्के वाढ
पुरी यांनी संसदेत सांगितले की, गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. ३३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी उपस्थित केला मुद्दा
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट बंद होत असल्याचे व लहान व्यापाऱ्यांवर परिणाम होत असल्याचे सांगत सरकारला प्रश्न विचारला. त्यावर पुरी म्हणाले, “हा अफवा पसरवण्याचा काळ नाही. देशात गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे.”





