Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नो खाते तपासा; पैसे जमा होण्यास सुरुवात, SMS आला नसेल तर….
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून, मे महिन्याचा सन्मान निधी १५ जूनच्या सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून, मे महिन्याचा सन्मान निधी १५ जूनच्या सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे वितरित केला होता. त्यानंतर आता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे. यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
अंतिम यादीत १ कोटी ७७ लाख महिला –
शासनाच्या आकडेवारीनुसार, या योजनेसाठी राज्यभरातून सुमारे अडीच कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या दीड वर्षांपासून अर्जांची सखोल छाननी आणि पडताळणी करण्यात आली. ३० एप्रिलपर्यंतची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर निकषांची पूर्तता न झाल्याने सुमारे ७० लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
अपात्रतेमागील प्रमुख कारणे –
अर्जांची तपासणी करताना उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबाची माहिती, इतर शासकीय योजनांचा लाभ तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असणे, ई-केवायसी अपूर्ण राहणे, दुबार अर्ज, चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे, आधार-बँक खाते लिंक नसणे आणि मोबाईल क्रमांकातील बदल यांसारख्या कारणांमुळे अनेक अर्ज बाद करण्यात आले.
एसएमएस आला नाही? घाबरू नका –
मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरवरील ताणामुळे अनेक लाभार्थींना बँकेकडून रकमेचा एसएमएस प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभार्थींनी अनावश्यक चिंता न करता आपल्या बँकेचे अधिकृत मोबाईल ॲप, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक अपडेट करून खात्यात रक्कम जमा झाली आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीत ठरली होती महत्त्वाची योजना –
महायुती सरकारने २०२४ मध्ये सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा सत्तेत आल्यास लाभाची मासिक रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, सध्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयेच जमा केले जात आहेत.





