जाणून घ्या भारतातील करोनाची ‘ताजी’ आकडेवारी

नवी दिल्ली – सहा दिवसानंतर भारतात दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 40 हजारापेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 37,975 इतकी आहे. 8 नोव्हेंबरपासून मागील सलग 17 व्या दिवशी दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांचा आकडा 50 हजाराच्या खाली आहे.
देशातील 2,134 प्रयोगशाळांच्या माध्यमातून भारताच्या चाचणी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. देशभरात एकूण एकत्रित चाचण्यांनी 13.3 कोटीचा टप्पा पार केला आहे.
दररोज घेतल्या जाणाऱ्या सरासरी 10 लाखांहून अधिक चाचण्यांमुळे एकत्रित बाधित रुग्ण दर कमी राखला जात असून सध्या त्यामध्ये निरंतर घसरण सुरू आहे. आज एकत्रित राष्ट्रीय बाधित रुग्ण दर 7 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.87 टक्के झाला आहे. दैनंदिन बाधित रुग्ण दर 3.45 टक्के झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण संख्येत सातत्याने घट झाली आहे.
गेल्या 24 तासात 42,314 रुग्ण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर देशभरात सक्रीय रुग्णांची संख्या 4,38,667 इतकी कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर देखील 93.76 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आतापर्यंत 86,04,955 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत काल सर्वाधिक 7216 नवीन रुग्ण बरे झाले असून केरळमध्ये 5,425 आणि त्यानंतर महाराष्ट्रात 3,729 लोक बरे झाले आहेत.
दिल्लीत काल एका दिवसात सर्वाधिक 4,454 नवीन रुग्ण आढळले तर त्या खालोखाल महाराष्ट्रात 4,153 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 480 मृत्यूची नोंद झाली. यापैकी दिल्लीत 121 तर पश्चिम बंगालमध्ये 47 आणि महाराष्ट्रामध्ये 30 मृत्यू झाले.





