‘राष्ट्रीय लोकदला’शी केलेल्या आघाडीचा ‘तोटा’च झाला; पराभवानंतर भाजपच्या नेत्यांमध्येच जुंपली

लखनौ – उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला ८० पैकी केवळ ३३ जागा मिळाल्या. पूर्वांचल भागाप्रमाणेत पश्चिम उत्तर प्रदेशातही भाजपची पिछेहाट झाली. अशात आता प. उत्तर प्रदेशातील भाजपच्याच दोन बड्या नेत्यांमध्ये शीत युध्द सुरू आहे. मुझफ्फरनगर येथून पराभूत झाल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजिव बलियान यांनी संगीत सोम यांच्यावर आरोप करताना सोम यांनीच समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला रिंगणात उतरवले असे म्हटले आहे. आता त्यांच्या या आरोपला सोम यांनी उत्तर दिले आहे.
बलियान त्यांच्या पाच वर्षांतील भ्रष्टाचारामुळे पराभूत झाले आहेत असे प्रत्युत्तर संगीत सोम यांनी दिले. ते म्हणाले की लोक वैतागले होते म्हणून बलियान हरले. जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलाशी आघाडी केल्याचाही काही फायदा झाला नाही. लोकदलाला आपल्या जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले मात्र ज्या जागा आम्ही स्वबळावर जिंकू शकत होतो तेथे आमचा पराभव झाला.
सरधना विधानसभा क्षेत्रात बलियान यांचा विजय झाला आहे, मात्र बुढाना आणि चरथावल येथे त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आपल्या पराभवाच्या कारणांचा बलियान यांनीच अभ्यास करावा. त्यांच्या कारणांमुळेच त्यांचा पराभव झाला आहे. त्यांनी तर सरधना येथील लोकांना तुरूंगात टाकले होते. मी निवडणूक हरलो तेंव्हा मी कोणावर आरोप केले नाहीत.
अगोदरच्या समाजवादी पक्षाच्या काळात माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. मला तुरूंगातही पाठवण्यात आले. असे असताना मी समाजवादी पक्षाला कशी साथ देईल? बलियान यांना जे काही म्हणायचे असेल ते त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मांडावे असा सल्लाही सोम यांनी त्यांना दिला.





