बंगलुरू – कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सीबीआयने सन 2016 च्या एका खून प्रकरणात अटक केली आहे. त्यावर कॉंग्रेसने संताप व्यक्त केला असून पक्षाचे कर्नाटक शाखेचे प्रभारी रणदीपसिंह सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, सीबीआयचा दुरुपयोग करून कॉंग्रेस नेत्यांची शिकार करण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्र सरकारने चालवला आहे.
कुलकर्णी यांना जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य योगेशगौडा गोैडर यांच्या सन 2016 साली झालेल्या खून प्रकरणात गुरुवारी धारवाडमध्ये अटक करण्यात आली. केंद्र सरकारने आपल्या बाहुले असलेल्या सीबीआयचा वापर करून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या सांगण्यावरून कुलकर्णी यांच्यावर ही दुष्ट हेतूने कारवाई केली आहे.
असल्या दहशततंत्राचा कॉंग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही आणि कॉंग्रेसजन असल्या प्रकाराच्या पुढे मान तुकवणार नाही असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. भाजपने या आधीही ईडी, आयकर विभाग यांचा दुरूपयोग करून डी. के. शिवकुमार, जी परमेश्वर, आणि अन्य लोकांवर अन्यायकारक कारवाई केली आहे असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली आहे.