धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्रींनी ‘तो’ पायंडा मोडला!

Namdev Shastri Bhagwangad: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणापासून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांचे जवळचे वाल्मिक कराड या प्रकरणात तुरूंगात आहेत. धनंजय मुंडे यांना आमदार सुरेश धस, मराठा नेते मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच विरोधकांनी घेरले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे आज वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.
नामदेव शास्त्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
धनंजय मुंडे भगवान गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली, याची मीडिया दखल का घेत नाही? धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांनादेखील याची जाणीव आहे की, धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.
नामदेव शास्त्रींनी कोणता पायंडा मोडला ?
नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यातच त्यांनी अनेक वर्षांचा एक पायंडा मोडल्याचे बोलले जात आहे. पूर्वी अनेक वर्ष भगवान गडावर दसरा मेळावा होत होता. वंजारी समाजाचे नेते गोपिनाथ मुंडे येथून जनतेला संबोधित करत असत. मात्र त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगवेगळ्या पक्षात असल्याने ते एकप्रकारे राजकीय विरोधक होते.
दोघांनाही आपण भगवान गडावर दसरा मेळावा घ्यावा असे वाटायचे. कारण संपूर्ण वंजारी समाज तेथे एकवटत असे. तेथे जो भाषण करेल तोच समाजाचा नेता अशी धारणा तयार झालेली होती. त्यातून वादही निर्माण झाले होते. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरुन कुठलेही राजकारण करु नका, असे सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र, आता नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरुन धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन एकप्रकारे राजकारणात उडी घेतली आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री यांनीच भगवान गडावरुन राजकारण न करण्याचा पायंडा मोडीत काढला आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.




