एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असे ते कुणाला म्हणाले तेच कळेना – अजित पवार

नवी दिल्ली – आमच्यात कुठलीही नाराजी नाही. आता परवाच एकनाथ शिंदे यांनी असा शब्द वापरला की, मला हलक्यात घेऊ नका. ते कुणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीला घेऊ नये की दुसऱ्या कोणीतरी त्यांना हलके घेऊ नये हे अजूनही स्पष्ट नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली. तसेच नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम आज पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार करून संमेलनाचा समारोप झाला. तसेच साहित्य महामंडळाच्या वतीने मांडण्यात आलेल्या एकूण १२ ठरावांना अनुमोदन देण्यात आले.
अजित पवार म्हणाले, आम्ही राज्याला पुढे नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. आजचा कार्यक्रम राजकीय नाही याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मात्र मी एक गोष्ट जरुर सांगतो. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे दु:ख मला निश्चित झालेले आहे. त्याचं कारण असं आहे की, महिला संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर या आमच्या थोरल्या बहीण आहेत. मी या नात्याने त्यांना तारा आक्का म्हणतो.
तारा आक्कांचे भाषण मी समाजमाध्यमांवर ऐकले. त्यानंतर मला वाटले की, हे भाषण प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मी सभागृहात असायला हवे होते. त्यांचे सात्विक, सोजवळ व्यक्तीमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द, शब्दाशब्दातून ऐकू येणारं मंजूळ, गोड नाद खूप प्रभावी करणारा होता. आताही मी त्यांच्यासोबत बोलत असताना विचारले की तुम्ही कुठे जास्त काळ राहता? तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितले. दादांच्या सांगलीत सांगितले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे भाषण ऐकले तेव्हा त्यांचे भाषण संपूच नये असे वाटत होते, असे देखील पवार यावेळी म्हणाले.
हा मराठी भाषेचा महाकुंभ – शिंदे
इतिहासात तलवारीने दिल्ली जिंकली, आता सारस्वतांच्या विचारांनी दिल्ली जिंकली आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे. अभिजात मराठीचे हे पहिले संमेलन असून हे देशाच्या राजधानीत होत आहे. दिल्लीतील हे साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





