MH Budget Session 2026: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सभागृहातील वातावरण अत्यंत गंभीर आणि भावूक बनले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला, त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. बोलताना त्यांचा आवाज दाटून आला आणि “दादा, तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या” असे शब्द उच्चारताना सभागृहातील प्रत्येक सदस्य भावूक झाला. गेली २२-२३ वर्षे एकत्र, आता पोकळी- “गेली २२-२३ वर्षे एकत्र काम केलेल्या सहकाऱ्याबद्दल अशाप्रकारे बोलण्याची वेळ येणे हे अत्यंत वेदनादायी आहे,” असे शिंदे म्हणाले. अजित पवारांसारखा नेता गमावणे ही राज्याची मोठी हानी असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे त्यांनी सांगितले. “कालची पत्रकार परिषद असो, शिवजयंतीचा कार्यक्रम असो किंवा आजचे सभागृह.. प्रत्येक ठिकाणी त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे होता’- ज्या दिवशी अजित पवारांचे निधन झाले त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, असे सांगताना शिंदे अधिकच भावूक झाले. “लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी नियतीपुढे माणूस हतबल ठरतो याची जाणीव करून दिली. या घटनेने पवार कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे नमूद करताना त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील दुःखद प्रसंगही सभागृहासमोर मांडले. अपघातात दोन मुलांचे निधन आणि गुरू आनंद दिघे यांचे जाणे या वेदना त्यांनी शब्दांत मांडल्या. “देवेंद्रजी आणि मी एक मित्र गमावला आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. फाईलमधील त्रुटी क्षणात हेरणारे, अभ्यासू प्रशासक- अजित पवारांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना शिंदे म्हणाले की, ते अत्यंत अभ्यासू होते आणि प्रशासनावर त्यांची पकड भक्कम होती. फाईल हातात घेतली की त्यातील त्रुटी ते लगेच दाखवून देत. बैठकीत कागदाचा एखादा तुकडाही पडलेला त्यांना चालत नसे. कोरोना काळातही ते मंत्रालयात जाऊन काम करत राहिले. अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजता बोलावून काम करून घेणे आणि कामात तडजोड न करणे हा त्यांचा स्वभाव होता. ‘नशिबाची साथ मिळाली असती तर मुख्यमंत्री झाले असते’ – “राजकारणात मतभेद आणि वाद असतात, पण अजित पवार अजातशत्रू होते,” असे शिंदे यांनी नमूद केले. पहाटेचा शपथविधी, त्यातून आलेली संपूर्ण जबाबदारी, तरीही ते कधी मागे हटले नाहीत. “नशिबाची साथ मिळाली असती तर ते निश्चितच मुख्यमंत्री झाले असते,” असे ते म्हणाले. सरकार स्थापनेच्या वेळी पत्रकार परिषदेत अजितदादांनी माईक घेऊन आपणहून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची आणि लाडकी बहीण योजना राबवण्याची घोषणा केल्याची आठवणही शिंदे यांनी सांगितली. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठाम – “आज सभागृहात पाहताना दादा समोरच उभे असल्यासारखे वाटते,” असे सांगत शिंदे यांनी भाषण संपवले. सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारून कार्यकर्त्यांना धीर देत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. विकास आता लांबणार नाही, विकास थांबणार नाही, ही घोषणा पुढे नेत राहू,” असे आश्वासन देत त्यांनी भाषण संपवले. सभागृहात काही क्षण शांतता पसरली आणि प्रत्येक सदस्याने या नेत्याच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.