Shivsena: उद्धव ठाकरे गटाचे हे खासदार शिंदे गटात जाणार? राज्यात खळबळ उडाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची महत्वाची माहिती
Shivsena: ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

Shivsena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांसोबत कोणतीही गुप्त बैठक झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. “ठाकरे गटाचे खासदार फुटणार नाहीत” असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या सर्व अफवा असून त्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. मागील दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची आपण पक्षाशी निष्ठावान राहणार असल्याची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे चर्चेत नाव आलेल्या खासदारांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Grampanchayat Election : महाराष्ट्रातील 771 ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार
ठाण्यातील व्होल्टास येथे गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पसरले होते. या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वकचौरे आदींची उपस्थिती असल्याचे सांगितले गेले. तसेच ओमराजे निंबाळकर यांच्यासह काही खासदार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाल्याचीही चर्चा होती. मात्र संबंधित खासदारांनी तसेच शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनीही हे वृत्त फेटाळले.
भाजपचे गिरीश महाजन यांनी “सध्या ऑपरेशन लोटस सुरू नाही, मात्र पुढील काळात काय होईल ते स्पष्ट होईल,” असे विधान केले. तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आल्याची टीका करत सध्याच्या राजकारणातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान सध्यातरी राज्यात कोणतेही खासदार पक्षांतर करण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट झाले आहे.





