पुणे जिल्हा : बैलगाडा शर्यतीला गालबोट; चऱ्होलीच्या घाटात राडा, आयोजकांवर दगडफेक

पुणे – चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे सोमवर (दि. 270 ते शुक्रवार (दि. 31) पर्यंत रंगलेल्या बैलगाडा शर्यतीला शेवटच्या दिवशी शुक्रवारी गालबोट लागले. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाडा पळवल्यानंतर बैलगाडा घाटात दगडफेक करण्यात आली. बैलगाडा धावण्याच्या वेळी घड्याळ चुकीचे दाखवल्याच्या कारणावरून आयोजकांवर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर घाटात तुफान राडा झाला तर जोरदार हाणामारी ही झाली. या घटनेनेनंतर पोलीस दाखल होऊन त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली तर काही जणांना ताब्यात घेतले आणि परिस्थिवर नियंत्रण आणले.
चऱ्होली येथे खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर पाटील यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी बैलगाडा शर्यतीचा शेवटचा दिवस होता. या शर्यतीचे बक्षीस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत वितरण समारंभ पार पडणार होता. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही; परंतु या शर्यतीमध्ये दगडफेक झाल्याने या स्पर्धेला गालबोट लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी अंतिम फेरी मध्ये 31 गाडे पळविण्यात येणार होते . यामध्ये एका गाड्यास चुकीचे सेकंद दिल्याने त्यांनीच आयोजकांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. तर यानंतर घाटामध्ये असलेली गाडाशौकीन यांची आणि संबंधित गाडा मालक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून पोलिस त्यांच्यावर काही कारवाई करतात का हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. उशिरापर्यंत आळंदी पोलीस ठाण्यमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
आमदार शेळकेंकडूनही…
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. मात्र या घटनेने गालबोट लागले आहे. आमदार सुनील शेळके यांनी देखील यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिग्गज नेत्यांनी या स्पर्धेला भेटी देखील दिल्या होत्या.मात्र शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाड्या वेळी हा अनुचित प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.




