Census 2027 Questionnaire: फरशीपासून छतापर्यंत… जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ‘हे’ सर्व प्रश्न विचारले जातील, यादी पहा
Census 2027 Questionnaire: देशातील बहुप्रतीक्षित जनगणनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, केंद्र सरकारने गुरुवारी ३३ प्रश्नांची अधिकृत सूची जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हे प्रश्न विचारले जाणार आहेत.

Census 2027 Questionnaire: देशातील बहुप्रतीक्षित जनगणनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, केंद्र सरकारने गुरुवारी ३३ प्रश्नांची अधिकृत सूची जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हे प्रश्न विचारले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही भारताची पहिली ‘पूर्णतः डिजिटल’ जनगणना ठरणार असून १५ वर्षांच्या खंडानंतर ही प्रक्रिया पार पडत आहे.
घरांच्या यादीसाठी विचारले जाणारे प्रमुख प्रश्न –
भारत सरकारचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांनी २२ जानेवारी रोजी याबाबतचे गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. त्यानुसार, जनगणनेचा पहिला टप्पा प्रामुख्याने ‘हाऊस लिस्टिंग’ (घरांची यादी तयार करणे) यावर आधारित असेल. यामध्ये खालील मुद्द्यांवर माहिती संकलित केली जाईल.
घराचे स्वरूप: घराचे बांधकाम, भिंती, छत आणि फरशीसाठी वापरलेले साहित्य.
कुटुंबाची माहिती: कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, घरातील व्यक्तींची एकूण संख्या.
घराचा प्रमुख: कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष? ते अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागास प्रवर्गातील आहेत का?
मालकी हक्क: घराची मालकी स्वतःची आहे की भाड्याची?
सुविधा व साधने: पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वापरले जाणारे अन्नधान्य, इंधनाचा प्रकार आणि कुटुंबाकडे असलेली वाहने (दुचाकी/चारचाकी).
३० दिवसांचा कालावधी
जनगणनेचा हा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान चालणार असला तरी, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा विशिष्ट कालावधी दिला जाईल.

Census 2027 Questionnaire
जम्मू-काश्मीरमध्ये १ ते ३० जून दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मुख्य सचिव अटल डुल्लू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
प्रक्रियेचा क्रम
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपर्यंत या संदर्भातील सर्व आवश्यक अधिसूचना जारी केल्या जातील. यावेळची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्व-गणना (Self-Enumeration) ,घरांची यादी तयार करणे, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना अशा प्रक्रिया क्रमाणे पार पडणार आहेत.





