जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी…’

सावंतवाडी – न्यायालयाने निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभार. पोलिसांना जी जी मदत हवी होती, ती केली. पुढेही करेन. मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. जेव्हा जेव्हा संपर्क करण्यात आला, फोन आला, तेव्हा मदत केली. कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाहीत. सगळी माहिती देत होतो आणि याही पुढे देणार आहे, असे आमदार नितेश राणे यांनी जामीन मिळाल्यावर म्हटले आहे.
मी विधिमंडळाचा सदस्य आहे. 2 वेळा निवडून आलेला प्रतिनिधी आहे. जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणीही माझे सहकार्य मागतात, तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो, असा दावा त्यांनी केला. नितेश म्हणाले की, पळण्याचा विषय आला नाही. पोलिसांना अटक करण्याची गरज लागली नाही. ज्या दिवशी मी शरण आलो, त्याच्या 4 दिवसांपर्यंतही मला कोर्टाचे प्रोटेक्शन होते. पण जे कोर्टाबाहेर घडले, गाडी अडवण्यात आली, सहकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवण्यात आले. त्यामुळे मी विचार केला. सिंधुदुर्गाच्या लोकांना त्रास होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी सरेंडर झालो. मला हे अटक करू शकले नाहीत. मला 2 दिवसांची पीसी दिली. मग मी एमसीआरमध्ये होतो.
मला आजही त्रास होतोय. कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला, असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे ते म्हणाले. नितेश म्हणाले की, मणका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय. त्याचा इलाज करणार, पण काही बोलले हा राजकीय आजार आहे. मग आरोग्य व्यवस्थेने ज्या-ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे. ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का, असा सवाल त्यांनी केला.





